शुक्रवार, ८ मार्च, २०२४

जंगली जयगड

 जंगली जयगड हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना या डोंगररांगेत वसलेला गिरीदुर्ग असून याची उंची ३१६० फुट आहे.कोयनानगर या गावापासून १२ किमीवर जंगली जयगड हा किल्ला आहे. या किल्ल्यावर व आजूबाजूस असलेल्या दाट जंगलामुळे या किल्ल्याला जंगली जयगड हे नाव देण्यात आले.घाटमाथ्याच्या टोकावर असणार्‍या या किल्ल्यावरून कोकणाच विस्तृत दर्शन होत. या गडाचे स्थान पहाता याचा उपयोग कुंभार्ली घाटावर व आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा.हा किल्ला चढण्यास सोपा असून गर्द जंगलातून जाणार्‍या रस्त्यामुळे ही एक दिवसाची पदभ्रमंती अल्हाददायक आहे.

हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून बाहेर आलेल्या फाट्यावर बांधलेला आहे.कोयनानगरच्या बाजूने सह्याद्रीचा मुख्य डोंगर चढून कोकणाच्या बाजूला आल्यावर समोर लांबवर पसरलेला सह्याद्रीचा फाटा व त्यावरील किल्ला दिसतो. येथेच गडाचे उव्धस्त प्रवेशव्दार आहे. झाडीत विखुरलेल्या घडीव दगडांवरून ते ओळखता येते. गडाच्या टोकाकडे जातांना आपल्याला दोन छोट्या कातळ सुळक्यांना वळसा घालून जावे लागते या सुळक्यांना स्थानिक लोक "दिपमाळ" या नावाने ओळखतात. या सुळक्याच्या बाजूने पुढे गेल्यावर थानाई देवीचे उव्धस्त मंदिर दिसते.किल्ल्याच्या टोकावर भगवा झेंडा लावलेला आहे.किल्ल्यावरून कोकणाच विस्तृत दर्शन होत. उजव्या बाजूस खाली कोळकेवाडी धरण व त्याच्या बाजूच्या डोंगरावरील कोळकेवाडी किल्ला दिसतो.डाव्या बाजूला खाली कुंभार्ली घाट दिसतो.किल्ला छोटा असल्यामुळे ३० मिनिटात पाहून होतो.

कराड- पाटण- कोयनानगर गावात पोहचावे.कोयनानगरहून नवजा गाव ११ किमी अंतरावर आहे.नवजा गावापुढे "पंचधारा" या कोयनेवरील पहिल्या बोगद्याकडे जाणारा रस्ता आहे. यारस्त्यावर ५०० मीटरवर एक चौकी आहे.ती ओलांडल्यावर साधारणपणे ५०० मीटरवर डाव्या हाताला एक कच्चा रस्ता डोंगरात गेलेला दिसतो.येथेपर्यंत खाजगी वहानाने जाता येते. येथून डोंगरचढण्यास सुरुवात करावी.वाट मळलेली असून गर्द झाडीतून जाते. साधारण अर्ध्या तासाने आपण पाण्याच्या झर्‍याजवळ पोहोचतो.या झर्‍याला फेब्रुवारी पर्यंत पाणी असते. पुढे १५ मिनिटात आपण सह्याद्रीचा मुख्य डोंगर चढून कोकणाच्या बाजूला आल्यावर समोर लांबवर पसरलेला सह्याद्रीचा फाटा व त्यावरील किल्ला दिसतो. येथून किल्ल्याच्या टोकावर जाण्यास अर्धा तास लागतो.पायथ्यापासून गडावर जाण्यास सव्वा तास लागतो.सदर किल्यास भेट देण्यासाठी वनखात्याची परवानगी घेणे आवश्यक आहे.







थानाई देवीचे उव्धस्त मंदिर





निसर्ग प्रेमी...शैलभ्रमर






४ टिप्पण्या:

निनावी म्हणाले...

छान

निनावी म्हणाले...

उत्तम ट्रेक सर

निनावी म्हणाले...

छान माहितपूर्ण

निनावी म्हणाले...

छानच..