सोमवार, ११ नोव्हेंबर, २०२४

महिमतगड


महिमतगड हा एक गिरिदुर्ग असून त्याची उंची २६५० फुट आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर 
तालुक्यात हा किल्ला वसलेला आहे.दाट झाडीत किल्ल्याचे अनेक अवशेष आहेत.किल्ल्यावर 
निगुडवाडी किवा कुंडी या पायथ्याच्या गावातून पायवाट आहे व ही दोन गावे विरुध्द दिशांना आहेत.
दोनही गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास २ तास लागतात.बालेकिल्ल्यावर ध्वजस्तंभ 
(A Triangulation Point) उभारलेला आहे.किल्ल्यावर पाण्याच्या टाक्यात पिण्याचे पाणी जानेवारी 
पर्यंत उपलब्ध असते.

संपर्क: प्रकाश जगदाळे ९९२३४३१९१९ 































 

रविवार, २४ मार्च, २०२४

रामघळ हेळवाक

 समर्थांच्या दुर्गम ठिकाणी वसलेल्या अनेक घळी पैकी ही घळ आहे.समर्थांनी या ठिकाणी चातुर्मास केला होता अशी इतिहासात नोंद सापडते.कराड-चिपळूण रस्त्यावर पाटणपासून २४ कि.मी. अंतरावर हेळवाक गाव आहे. या गावाच्या जवळच्या डोंगरावर ही ळ आहे.या घळीवरून बाराही महिने धबधबा पडतो. हे पाणी पिण्यायोग्य आहे. हेच पाणी पुढे कोयनेत जाऊन मिळतं. स्थानिक लोक या पाण्याला रामनदी म्हणतात.मळलेल्या पायवाटेने एक तासात ह्या ठिकाणी पोहोचता येते.

नदी खळाळती बळे । जळे बहुत चंचळे ।

फुगे चळण वाकणे । निरे विराजीती गुणे ।।

अनेक वृक्ष दाटले । निबीड दाट थाटले ।

वने वने बहु वने । अचाट दाटली घने ।

बहुत बोलती खगे । चमक दावीली मृगे ।

कुसुम वाटीका भरे । विगुतली मधुकरे ।।

समर्थांनी केलेल्या या घळीचं हे यथार्थ वर्णन आजही इथे अनुभवायला मिळतं.










रविवार, १७ मार्च, २०२४

केमसे गुहा

सह्याद्रीच्या कडे कपाऱ्या मध्ये अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित गुहा आढळतात.केमसे गावाजवळ अशीच एक प्राचीन किंवा अश्मयुगीन गुहा दाट जंगलात वसलेली आहे.कुंभार्ली घाटा माथ्यापासून २ किलोमीटर अंतरावर ही प्रचंड मोठी नैसर्गिक गुहा आहे.गावातील तलावा पासून पुढे गेल्यानंतर मळलेल्या पायवाटेने १५ मिनिटात या ठिकाणी पोहोचता येते.

प्रकाश जगदाळे:- ९९२३४३१९१९









केमसे गावातील तलाव






गुहेतून सूर्यप्रकाशाकडे झेपावणारा वृक्ष 




शुक्रवार, ८ मार्च, २०२४

जंगली जयगड

 जंगली जयगड हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना या डोंगररांगेत वसलेला गिरीदुर्ग असून याची उंची ३१६० फुट आहे.कोयनानगर या गावापासून १२ किमीवर जंगली जयगड हा किल्ला आहे. या किल्ल्यावर व आजूबाजूस असलेल्या दाट जंगलामुळे या किल्ल्याला जंगली जयगड हे नाव देण्यात आले.घाटमाथ्याच्या टोकावर असणार्‍या या किल्ल्यावरून कोकणाच विस्तृत दर्शन होत. या गडाचे स्थान पहाता याचा उपयोग कुंभार्ली घाटावर व आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा.हा किल्ला चढण्यास सोपा असून गर्द जंगलातून जाणार्‍या रस्त्यामुळे ही एक दिवसाची पदभ्रमंती अल्हाददायक आहे.

हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून बाहेर आलेल्या फाट्यावर बांधलेला आहे.कोयनानगरच्या बाजूने सह्याद्रीचा मुख्य डोंगर चढून कोकणाच्या बाजूला आल्यावर समोर लांबवर पसरलेला सह्याद्रीचा फाटा व त्यावरील किल्ला दिसतो. येथेच गडाचे उव्धस्त प्रवेशव्दार आहे. झाडीत विखुरलेल्या घडीव दगडांवरून ते ओळखता येते. गडाच्या टोकाकडे जातांना आपल्याला दोन छोट्या कातळ सुळक्यांना वळसा घालून जावे लागते या सुळक्यांना स्थानिक लोक "दिपमाळ" या नावाने ओळखतात. या सुळक्याच्या बाजूने पुढे गेल्यावर थानाई देवीचे उव्धस्त मंदिर दिसते.किल्ल्याच्या टोकावर भगवा झेंडा लावलेला आहे.किल्ल्यावरून कोकणाच विस्तृत दर्शन होत. उजव्या बाजूस खाली कोळकेवाडी धरण व त्याच्या बाजूच्या डोंगरावरील कोळकेवाडी किल्ला दिसतो.डाव्या बाजूला खाली कुंभार्ली घाट दिसतो.किल्ला छोटा असल्यामुळे ३० मिनिटात पाहून होतो.

कराड- पाटण- कोयनानगर गावात पोहचावे.कोयनानगरहून नवजा गाव ११ किमी अंतरावर आहे.नवजा गावापुढे "पंचधारा" या कोयनेवरील पहिल्या बोगद्याकडे जाणारा रस्ता आहे. यारस्त्यावर ५०० मीटरवर एक चौकी आहे.ती ओलांडल्यावर साधारणपणे ५०० मीटरवर डाव्या हाताला एक कच्चा रस्ता डोंगरात गेलेला दिसतो.येथेपर्यंत खाजगी वहानाने जाता येते. येथून डोंगरचढण्यास सुरुवात करावी.वाट मळलेली असून गर्द झाडीतून जाते. साधारण अर्ध्या तासाने आपण पाण्याच्या झर्‍याजवळ पोहोचतो.या झर्‍याला फेब्रुवारी पर्यंत पाणी असते. पुढे १५ मिनिटात आपण सह्याद्रीचा मुख्य डोंगर चढून कोकणाच्या बाजूला आल्यावर समोर लांबवर पसरलेला सह्याद्रीचा फाटा व त्यावरील किल्ला दिसतो. येथून किल्ल्याच्या टोकावर जाण्यास अर्धा तास लागतो.पायथ्यापासून गडावर जाण्यास सव्वा तास लागतो.सदर किल्यास भेट देण्यासाठी वनखात्याची परवानगी घेणे आवश्यक आहे.







थानाई देवीचे उव्धस्त मंदिर





निसर्ग प्रेमी...शैलभ्रमर